समुद्राच्या उधाणात भाट्ये किनाऱ्यावरील 35 माड गेले वाहून

रत्नागिरी:- उच्चतम भरतीच्या वेळी भाट्ये किनारी समुद्राचे अतिक्रमण झाले असून त्यात किनाऱ्यावरील रत्नसागर बीच रिसॉर्टच्या 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. समुद्र तीन मीटर आत घुसला असून अर्धा किलोमीटर भागाची धूप झाली आहे. भविष्यात चाळीस नारळाच्या झाडांना धोका असून सलग दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनाऱ्यावर हा प्रकार घडला आहे.

भाट्ये किनाऱ्यावर झरीविनायक मंदिराच्या बाजूला रत्नसागर बीच रिसॉर्टमध्ये नारळासह विविध झाडे लावण्यात आली आहेत. समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूने आतमध्ये घुसत होत्या. लाटा किनाऱ्यावर तीन मीटर आतमध्ये आल्या आहेत. येथील वाळू पाण्याच्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहून जात होती. भरतीच्या लाटा वाढू लागल्यानंतर एक-एक नारळाची झाडे कोसळू लागली. एकापाठोपाठ एक सुमारे 35 नारळाची झाडे पडली. झाडावरील लागलेले नारळ समुद्राच्या पाण्यात पडून वाहून गेले. येथील काही झाडे वाकली असून ती केव्हाही कोसळतील अशी परिस्थिती आहे. सुमारे चाळीस झाडांना भविष्यात धोका आहे. समुद्राच्या लाटांचे तांडव पाहणाऱ्या रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनीही यंदा प्रथमच अशा प्रकारे लाटांचा जोर पाहायला मिळाल्याचे सांगितले.