अपघातात गमावला पाय; उद्योजक महेंद्र गुंदेचा आणि सौरभ मलुष्टे यांच्यामुळे पुन्हा दोन पायांवर उभा राहिला तरुण

रत्नागिरी:- रस्ते अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील तरुणाने एक पाय गमावला. घरची जबाबदारी खांद्यावर असताना पाय गमवावा लागल्याने कुटुंबाचा कणाच मोडला. मात्र या तरुणासाठी देवदूता सारखे धावून आले ते उद्योजक महेंद्र गुंदेचा आणि सौरभ मलुष्टे. या तरुणाला कृत्रिम पाय बसवून देण्याची जबाबदारी या दोघांनी उचलली आणि पार देखील पाडली.

संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील एकनाथ रेवाळे हा तरुण.गावातील एक हरहुन्नरी असणाऱ्या ह्या तरुणावर नियती रुसली. रस्ते अपघात झाला आणि त्यात या तरुणाला एक पाय गमवावा लागला.स्वतः च्या पायावर उभ्या राहणाऱ्या तरुणाला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला.अशा परिस्थितीत चालणे देखील फार कठीण होते. मात्र या तरुणासाठी उद्योजक सौरभ मलूष्टे आणि महेंद्र गुंदेचा अगदी देवदूत बनून धावले.

घरातील कुटुंब प्रमुख तरुणावर कोसळलेल्या या आपत्तीतुन त्यांची सुटका करण्याचा निर्णय गुंदेचा आणि मलुष्टे यांनी घेतला.उपचारासाठी रेवाळे यांना तात्काळ हुबळी कर्नाटक येथील ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन संचालित महावीर लिंब सेंटर येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानुसार रेवाळे यांना हुबळी येथील लिंब सेंटर मध्ये पाठवून त्यांना कृत्रिम पाय मोफत उपलब्ध करून देण्यात आला. हुबळी येथे जाताना एका पायावर आणि हातात कुबड्या घेऊन गेलेले अपघातग्रस्त एकनाथ रेवाळे येताना कृत्रिम पायाच्या सहाय्याने कुबड्या शिवाय चालू लागले.

हुबळी येथील श्री अशोक कोठारी आणि रत्नागिरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितिन ढेरे यांनी देखील या कामात मोलाचे सहकार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यातील कुठल्याही अपंग व्यक्तीला कृत्रिम अवयव बद्दल मदत हवी असल्यास त्यांनी महेंद्र गुंदेचा(9422429599) व सौरभ मलुष्टे(7972130853)या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.आर्थिक दुर्बल व्यक्तींना शक्य तितके मोफत कृत्रिम अव्यव उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.