समुद्राच्या अतिक्रमणाने भाट्ये किनाऱ्याचे प्रचंड नुकसान 

अर्धा किलोमीटरची धुप; 35 नारळाच्या झाडांचे नुकसान

रत्नागिरी:- हायटाईडमुळे भाट्ये किनारी समुद्राचे अतिक्रमण झाले असून त्यात किनार्‍यावरील रत्नसागर बीच रिसॉर्टच्या 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. समुद्राचे तीन मीटर आत किनार्‍यावर आले असून अर्धा किलोमीटर भागाची धुप झाली आहे. भविष्यात चाळीस नारळाच्या झाडांना धोका असून सलग दुसर्‍या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनार्‍यावर हा प्रकार घडला आहे.

पावसाळ्यात दरवर्षी कोकणातील किनार्‍यांची धूप होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरकरवाडा, काळबादेवी, मांडवी किनारी समुद्राच्या उधाणाचा तडाखा किनार्‍यावरील लोकांना बसत आहे. यंदाही तिच परिस्थिती असून मिर्‍या येथे किनार्‍यावर भगदाड पडले आहे. तीन दिवसांपुर्वी रत्नागिरीतील भाट्ये किनार्‍यावर समुद्राच्या भरतीचे पाणी आतमध्ये घुसले होते.

भाट्ये किनार्‍यावर झरीविनायक मंदिराच्या बाजूला रत्नसागर बीच रिसॉर्टमध्ये नारळासह विविध झाडे लावण्यात आली आहेत. समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूने आतमध्ये घुसत होत्या. लाटा किनार्‍यावर तीन मीटर आतमध्ये आल्या आहेत. येथील वाळू पाण्याच्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहून जात होती. भरतीच्या लाटा वाढू लागल्यानंतर एक एक नारळाची झाडे कोसळू लागली. एकापाठोपाठा एक सुमारे 35 नारळाची झाडे धाराशाही पडली. झाडावरील लागलेले नारळ समुद्राच्या पाण्यात पडून वाहून गेले. येथील काही झाडे वाकली असून ती केव्हीही कोसळतील अशा परिस्थितीत आहेत. सुमारे चाळीस झाडांना भविष्यात धोका आहे. ही परिस्थिती पाहणार्‍या रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांनीही यंदा प्रथमच अशाप्रकारे लाटांचा जोर पहायला मिळाल्याचे सांगितले.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार एका झाडाचे नुकसान अडीच हजार रुपये आहे. पुर्वी भाट्ये किनारी रिसॉर्टच्या अर्धा किलोमीटर भागामध्ये वाळूचा नैसर्गिक बंधारा होता. तो सुमारे तिन फुट उंचीचा बंधारा होता. हा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार नारळाच्या एका झाडाचे नुकसान 2500 रुपये आहे. भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर सर्व झाडांचे मिळून सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा फटका बसला आहे.

गतवर्षी भाट्ये किनार्‍यांची अशाचप्रकारे धुप झालेली होती. गतवर्षी भाट्येतील काही सुरुची झाडे, स्मशानभुमीचा भाग आणि किनार्‍यावरील वॉच टॉवरचा भाग वाहून गेला होता. यंदा समुद्राच्या लाटांची दिशा बदलली असून झरीविनायक मंदीराकडील भागात लाटांचा अधिक जोर होता. अजुन अमावास्या आणि पौर्णिमेच्या दोन मोठ्या भरती अजुनही येणार आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस आणि वारा असेल तर भाट्ये किनार्‍याची अवस्था मिर्‍याप्रमाणाचे होऊ शकते. भाट्ये हा पर्यटन किनारा आहे. त्यामुळे येथे सुरक्षेसाठी योग्य ती पावल उचलणे आवश्यक आहे. दरम्यान गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेकांनी पडलेली झाडांचा उपयोग सेल्फी काढण्यासाठी केला आहे. किनार्‍यावर आलेली अनेक कुटूंबे सेल्फी काढताना दिसत होती.

समुद्राच्या उधाणामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. लाटांच्या पाण्यात नारळाची झाडे वाहून गेलेली असून भविष्यात काही झाडांनाही धोका निर्माण झालेला आहे. – माधव बापट, मंडळ कृषी अधिकारी