माजी सभापतीला रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

पतीविरोधात पत्नीची पोलीस स्थानकात धाव

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांना पतीने अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या विरोधात सुकांत सावंत याच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नाली सावंत या संशयित आरोपी सुकांत गजानन सावंत (43, रा. सडामिऱ्या रत्नागिरी) याच्या दुसऱ्या पत्नी आहेत. गेल्या काही वर्षापासून या दोघांमध्ये वाद सुरू असून स्वप्नाली हीने यापुर्वी मारहाण केल्याप्रकरणी सुकांत याच्याविरूद्ध तकार दाखल केली होती. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सडामिऱ्या येथे राहत्या घरी सुकांत व स्वप्नाली यांच्यात वैवाहिक कारणावरून वाद उफाळून आला. 

स्वप्नाली हिच्याशी वादातून सुकांत याच्या रागाचा पार वाढत गेला. यातून सुकांत याने प्लास्टिकच्या बाटलीमधील पेट्रोल स्वप्नाली हिच्या अंगावर ओतल माचीस घेवून स्वप्नाली हिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी स्वप्नाली हिने पतीच्या तावडीतून स्वतची सुटका करत मागच्या दाराने पळ काढला. पतीच्या या कृत्यामुळे घाबरलेल्या स्वप्नाली हिने शहर पोलिसांत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती सुकांत सावंत याच्याविरूद्ध भादवि कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे.