महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली

रत्नागिरी:- महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना प्रथमतः आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आली होती. 23 मे 2020 पासून या योजनेची व्याप्ती वाढवून ती राज्यातील सर्व व्यक्तींकरीता लागू करण्यात आली.

कोविड-19 च्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा, या अनुषंगाने शासनाने पांढर्‍या रेशनकार्डचा समावेश केला आहे. 31 जुलै 2020 पर्यंत राज्यातील सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, मात्र आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून या योजनेला 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हयातील खाजगी रुग्णालयांमध्ये जून, जुलै महिन्यात 1940 रुग्णांनी या योजनेअंतर्गत मान्यता असलेल्या आजारांवरील उपचाराचा लाभ घेतला आहे. त्यापैकी 181 व्यक्ती या पांढर्‍या रेशनकार्ड असणारे आहेत. कोविड 19 ची लागण झालेल्या 22 रुग्णांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयामाफत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हयातील रामनाथ हॉस्पीटल, परकार हॉस्पीटल (रत्नागिरी), पं. दीनदयाळ उपाध्याय हॉस्पीटल (लांजा), वालावलकर हॉस्पीटल, लाईफकेअर हॉस्पीटल, एस.एम.एस. हॉस्पीटल, अपरांत हॉस्पीटल (सर्व चिपळूण) यासह इतर सात शासकीय रुग्णालयात या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.