जलशुद्धीकरण प्रकल्पात बसणार अद्ययावत यंत्रणा

रत्नागिरी:-शहराला मुबलक आणि अतिशुद्ध पाणी मिळावे यासाठी पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शीळ जाकवेल येथील क्षमता कमी झालेले जुने पंप बदलुन दोन नवीन विद्युत पंप बसविण्यात येणार आहेत. तसेच साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्यात येणार आहे. यामुळे काही सेकंदामध्ये अगदी गढुळपाणी देखील शुद्ध होऊन शहरवासीयांना मिळणार आहे. शहरवासीयांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी आम्ही अडिच ते तीन कोटीचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली.

पालिकेत आज पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेवेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शीळ जॅकवेलवर आपण 1 कोटी रुपये खर्च करून जनेटर बसविल्याचा मोठा फायदा झाला. त्यामुळे पावसाळ्यात तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित होत होता. तेव्हा देखील शहरवासीयांना जनरेटरमुळे चांगले पाणी मिळाले. जॅकवेलवर जुने विद्युत पंप आहे. मात्र त्याची आता क्षमता न राहिल्याने ते 50 टक्केच पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे 24 तास पंपिंग सुरू ठेवावे लागते. त्यामुळे पालिकेला सुमारे 11 ते 12 लाख महिन्याला वीज बिलापोटी मोजावे लागतात. म्हणून किर्लोस्कर कंपनीच मोठे दोन पंप बसविण्याचा आम्ही निर्णय घेतोय. या पंपांमुळे 16 तासात आपली टाकी फुल होणार आहे. त्यामुळे आठ तासाच्या विजेची बचत होणार आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. दोन्ही पंपांची किम्मत कोटीच्या दरम्यान आहे. परंतु यामुळे शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार आहे.
पाण्यावर प्रक्रिया करून शहराला शुद्ध पाणी देणार्‍या जलशुद्धीकरण केंद्राचीही परिस्थितीत दयनिय आहे. ज्या वेगात आणि दर्जामध्ये पाणी शुद्धीकरण होणे अपेक्षित आहे ते होत नाही. त्यामुळे अनेक वेळा शहरवासियांना पावसाळ्यात व अन्य दिवसांमध्ये गढुळ पाणी पुरवठा होतो. मात्र आता जलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यावर सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत यंत्रणा बसविण्यात येणार आहे. काही सेकंदमध्ये गढुळ पाणी शुद्ध करणारी यंत्रणा पालिका बसविणार आहे. तसेच इमारतीची दुरूस्तीही केली जाणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास शहरवासीयांना मुबलक आणि शुद्ध पाणी मिळणार आहे, असे श्री. साळवी यांनी सांगितले