मिऱ्या किनारी फसलेल्या जहाजाची पावसाळ्यानंतरच सुटका

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळात भरकटून गेले दीड महिना मिर्‍या बंधार्‍याजवळ अडकून पडलेले जहाज काढण्यात येणार आहे. बसरा स्टार एजन्सीकडून बंदर विभागाला तसे कळविण्यात आले असून ही कार्यवाही पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येईल. खवळलेला समुद्र शांत झाल्यानंतर आधी दुरुस्ती केली जाणार आहे.

जुलैच्या सुरवातीलाच आलेल्या चक्रीवादळामुळे समुद्र प्रचंड खवळलेला होता. यामध्ये गोव्याकडून दुबईकडे जाणारे बसरास्टार कंपनीचे जहाज अडकले होते. ते जहाज प्रवास करत रत्नागिरीतील भगवती बंदराजवळ येऊन थांबले. नांगर टाकून ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. वारा आणि पाण्याला असलेल्या करंटमुळे ते जहाज भरकटले. समुद्र खवळल्यामुळे त्यावरील नियंत्रण ठेवणे अशक्य होते. या परिस्थिती भरकटत ते जहाज मिर्‍या किनार्‍यावर लागले. गेले दीड महिना ते तिथेच उभे आहे. सुरवातीला जहाजातील 25 हजार लिटर डिझेल काढण्यात आले. त्यानंतर ते जहाज काढण्यासंदर्भात कंपनीने तत्काळ कार्यवाही करावी असे पत्र बंदर विभागाकडून देण्यात आले होते. त्याचा पाठपुरावाही बंदर विभागाकडून सुरु होता; मात्र कंपनीकडून जहाज काढण्याविषयी कोणतीच कार्यवाही केली जात नव्हते. त्यामुळे जहाज मिर्‍या येथेच सडून जाणार की काय असा प्रश्‍न निर्माण झाला होता. याबाबत मिर्‍यावासींयामध्येही उत्सूकता होती. संबंधित कंपनीकडून जहाज पावसाळ्यानंतर काढले जाईल असे बंदर विभागाला कळवले आहे. सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे ते बाहेर काढणे अशक्य आहे. तत्पुर्वी लाटांमुळे जहाजाचा तळाकडील भाग नादुरुस्त झाला असून पाणी आतमध्ये शिरले आहे. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हे काम सुरु करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. प्रत्यक्षात जहाज काढण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात सुरुवात केली जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, समुद्र खवळलेला असल्याने जहाज बंधार्‍याच्या दिशेने झुकलेले आहे. लाटांच्या तडाख्यात जहाजाची मोठ्याप्रमाणात नासधुस झालेली आहे. त्यासाठी येणारा खर्च लाखो रुपयांच्या घरात जाऊ शकतो. दुरुस्तीसह जहाज काढण्यासाठी कोटीच्या घरात खर्च जाईल असा अंदाज आहे.

जहाज काढण्यासंदर्भात दिलेल्या पत्राला जहाजाच्या कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे. पावसाळी परिस्थिती निवळल्यानंतर जहाज काढण्यासाठी कंपनीकडून कार्यवाही केली जाणार आहे.
– कॅ. संजय उगलमुगल, प्रादेशिक बंदर अधिकारी