रत्नागिरीत कोरोनाच्या अफवांचे पीक; व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम 

रत्नागिरी:-शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या राम आळी, गोखले नाका परिसरातील व्यापार्‍यांना कोरोना झाला आहे, त्यामुळे बाजारपेठेत जाऊ नका असा दुकानमालक आणि नोकरांच्या नावाने समाजमाध्यमातून व्हायरल होणार्‍या मेसेजमुळे आज या मुख्य बाजारपेठेत ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त करत  या अफवेविरोधात तक्रार नोंदवण्याचे ठरवले.

रविवारी दिवसभर विशेषतः व्हॉट्सअपद्वारे कोरोना रुग्णांची नावे व्हायरल करणारा मेसेज फिरत होता. काल बाजारपेठ बंद होती. परंतु या अफवेच्या मेसेजचा एवढा परिणाम झाला की आज सकाळपासून राम आळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, मारूती आळी, गाडीतळ या भागांमध्ये ग्राहकांची अत्यल्प गर्दी पहायला मिळाली. गोखले नाका या परिसरात शुकशुकाट होता. यामुळे येथील व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे सुमारे दोन ते तीन महिने बाजारपेठ बंद होती. परंतु ती काही अटी-शर्तींवर उघडली असली तरीही  गर्दी होत नव्हती. परंतु पावसाळी खरेदीसाठी ग्राहक येत होते. सामाजिक अंतर राखून कामकाज सुरू होते. यंदा सर्व सणांवरही कोरोनाचे संकट असल्याने बाजारपेठेत खरेदीचा ट्रेंड दिसत नाही. आता लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी सर्व प्रकारच्या विक्री होईल, अशी आशा व्यापार्‍यांनी बाळगली होती. आता बाप्पाच्या आगमनाला फक्त चार-पाच दिवस राहिले असून बाजारात ग्राहक येण्याची शक्यता जास्त आहे. परंतु यावर कोराना अफवेच्या मेसेजने पाणी फेरले आहे.

यासंदर्भात शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर पाळूनच व्यापारी व ग्राहकांनी व्यवसाय करावा. सर्वांनी काळजी घ्यावी. परंतु सोशल मीडियावर अफवेमुळे बाजारात ग्राहक येत नसल्याने व्यापार्‍यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कृपया कोणीही अफवा पसरवू नये, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.