13 दिवसात 51 हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल 

रत्नागिरी:- शासनाच्या निकषानुसार दहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असल्यामुळे कोकणात येणार्‍यांचे प्रमाण कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांचा ओघही कमी झाला आहे. 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात 51 हजार प्रवासी दाखल झाले आहेत. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापुढे गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.

गणेशोत्सवासाठी जे चाकरमानी कोकणात येणार होते, त्यांच्यासाठी क्वारंटाईन कालावधी किती ठेवायचा यावरुन गोंधळ निर्माण झाला होता. ग्रामपंचायतींनी चौदा दिवसांचा कालावधी ठेवला होता. त्यानुसार काही चाकरमानी 1 ऑगस्टपासून कोकणात येऊ लागले होते. त्यानंतर राज्य शासनाने क्वारंटाईन कालावधी दहा दिवसांचा केला. या संधीचा फायदा चाकरमान्यांचा झाला. चाकरमान्यांसाठी एसटी सुविधाही करण्यात आली होती. 1 ऑगस्टपासून आजपर्यंत जिल्ह्यात 51 हजार चाकरमानी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासाठी गावागावात होम क्वारंटाईनची सुविधा करण्यात आली आहे. 22 ऑगस्टला गणेशोत्सव आहे. हे लक्षात घेऊन चाकरमानी गावाकडे परतत आहेत.

गणेशोत्सवापुर्वी दहा दिवसांचा कालावधी संपुष्टात आला असून यापुढे येणार्‍या चाकरमान्यांना कोविड टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. बहूतांश चाकरमान्यांनी चाचणी न करता एसटीसह खासगी वाहनातून कोकणात ऐंट्री केली आहे. दहा दिवसांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने मुबंई-गोवा महामार्गावर गुरुवारपासून वाहनांची गर्दी कमी होती. पोलिस प्रशासनही सतर्क झाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण तपासणी केंद्रावर कडक तपासणी सुरु आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून बारा टिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरु करण्यात आली आहे. त्याठिकाणी 21 हजार जणांची स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यातील पाचशे जणांची अ‍ॅण्टीजेन टेस्टही केली गेली आहे. या चाचणीत बाधित येण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे बहूतांश चाकरमानी कोरोनामुक्त असल्याचे चित्र आहे.