विनामास्क फिरणाऱ्या 68 जणांना 34 हजारांचा दंड

रनपची कारवाई; सहा दिवसातील स्थिती 

रत्नागिरी:-शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होताना दिसत आहे. त्यामुळे पालिकेने कडक पावले उचलली असून, मास्क न घालणाऱ्यांना दणका दिला. अवघ्या सहा दिवसांत मास्क न लावणाऱ्या 68 जणांविरुद्ध कारवाई करून 34 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, या विषाणूचा फैलाव वाढू लागल्याने नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी पालिकेने कडक पावले उचलली. त्यासाठी भरारी पथक नेमले आहे. या भरारी पथकांद्वारे गेल्या सहा दिवसांमध्ये धडक कारवाई करीत 68 जणांना दणका दिला. मास्क न घालता फिरणाऱ्या 68 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला.पालिकेच्या दंडात्मक कारवाईचा वेग वाढला असून, गेल्या सहा दिवसांत 34 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही, हे पाहून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके फिरत आहेत. शहरात पालिकेचे अधिकारी किरण मोहिते आणि नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक, तीन ते सायंकाळी सहापर्यंत शहरात फिरून कारवाई केली जात आहे. या पथकात पोलिसांचा समावेश आहे.