गणेश विसर्जनाकरिता शहरात 13 ठिकाणी कृत्रिम तलाव

नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची संकल्पना

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने गणेशोत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने घरगुती गणेश विसर्जनासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या गार्डनमध्ये असणार्‍या विहिरी, काही ठिकाणी कृतिम तलाव अशा 13 ठिकाणी पालिका विसर्जनाची व्यवस्था करणार आहे, अशी माहिती. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने गणेशोत्सवासाठी वेगळी नियमावली तयार केली आहे. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. 22 ऑगस्टला गणेशाचे आगमन होत आहे, तर 27 तारखेला घरगुती गणपतींचे विसर्जन आहे. शासनाच्या सूचनांनुसार घराजवळच असणार्‍या तलावात अथवा कृतीम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे आहे. त्यासाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी संबंधितांनी घ्यायची आहे. विसर्जनाची व्यवस्था नागरिकांनी जवळच करायची आहे. नागरिकांची गणेशोत्सवात गैरसाये नको म्हणून पालिकने पुढाकार घेतला आहे. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी याबाबत आत्तापासूनच पावले उचलायला सुरुवात केली आहे.

कालच मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी यांच्यासोबत याबाबत बैठक झाली. बैठकीत याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी उचलली. शहरातील पालिकेच्या गार्डनमध्ये असणार्‍या विहिरी व काही ठिकाणी कृतिम तलाव करून गणेश विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे, असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले. शहरात एकूण 13 ठिकाणी तशी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जुना माळ नाका येथील कृत्रिम तलाव निर्माण करण्याची जबाबदारी नगरसेवक निमेश नायर यांनी उचलली आहे.