महिलेने महिलेवर पिस्तुल रोखल्याची एकच चर्चा

रत्नागिरी:- तू घरातून बाहेर पड, तुला गोळ्या घालून ठारच मारते, अशी धमकी देत रिव्हॉल्वरचा धाक दाखवून महिलेकडून प्रकरण मिटविण्यासाठी 25 लाखांची मागणी झाल्याची चर्चा पावस-नाखरे परिसरात जोरदार सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज देखील दाखल झाले आहेत.

जुलै महिन्यात घडलेल्या या प्रकाराचा बोलबाला सर्वत्र होऊ लागला आहे. त्यानंतर हळूहळू एकएक किस्से बाहेर येऊ लागले आहेत. हे प्रकरण परस्पर मिटवण्यासाठी देखील बरेच प्रयत्न झाले. मात्र जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज गेल्यानंतर या प्रकरणाला अधिकच वाचा फुटली आहे.

पती फेसबुकवर मैत्रीणीशी गप्पा मारतो, त्याचे प्रेमाचे संबंध असावेत असा संशय त्या महिलेने घेतला होता. त्यावरून सारे महाभारत घडल्याची चर्चा सुरु आहे. संतप्त झालेली महिला 11 जुलै रोजी सकाळी-सकाळी नाखरे गावात दाखल झाली होती आणि त्या ठिकाणी जाऊन तिने एका घरात चांगलाच तमाशा केल्याचे देखील बोलले जात आहे. या प्रकरणाची पूर्णगड पोलीस स्थानकात नोंद देखील करण्यात आली आहे.