ठाकरेंचा विश्वासू शिलेदार नाराज; मनधरणीसाठी प्रयत्न

मुंबई:- फडणवीस सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेले शिवसेनेचे एक महत्त्वाचे शिलेदार रवींद्र वायकर यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लागावी यासाठी ते आग्रही असून त्या अनुषंगाने त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे समजते.

मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले रवींद्र वायकर हे मागील सरकारमध्ये गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री होते. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तिन्ही पक्षांच्या सत्तावाटपात मंत्रिपदांची संख्या मर्यादित झाल्यामुळं वायकर यांना संधी मिळू शकली नाही. त्यामुळं ते नाराज होते. काही महिन्यांपूर्वी रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक म्हणून वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. या पदाला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जाही असणार होता. मात्र, प्रत्यक्षात काही घडलं नाही.

आता पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) एखाद्या महत्त्वाच्या पदावर म्हणून वर्णी लागावी, अशी त्यांची मागणी आहे. त्या संदर्भात नुकतीच वर्षा निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे यांनी वायकर यांना नेमकं काय आश्वासन दिलं हे कळू शकलेलं नाही. मात्र, वायकर यांना सामावून घेतल्यास इतरांचीही नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिवसेनेची डोकेदुखी वाढल्याचे समजते.