कुसुमताई पतसंस्थेत सव्वा दोन कोटीच्या ठेवी

ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

रत्नागिरी:- तालुक्यातील प्रतिथयश कुसुमताई पतसंस्थेने जाहीर केलेल्या ठेववृध्दी मासाला यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत पतसंस्थेच्या सर्व शाखांमधून सव्वा दोन कोटी रुपयांची ठेव जमा झाल्या आहेत. त्यामुळे पतसंस्थेने हा ठेववृध्दी मासाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. नाना शिंदे, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी कुसुममाई पतसंस्थेची स्थापना करण्यात आली होती. तो उद्देश आतापर्यंत सफल झाला आहे. या पतसंस्थेच्या शाखा जाकादेवी बाजारपेठ, पावस बाजारपेठ, खेडशी गयाळवाडी फाटा येथे सुरु आहेत. शुंगारतळी बसस्टॅण्डजवळ नव्याने पतसंस्थेची शाखा सुरू झाली. या शाखेतही अनेक ग्राहकांनी विश्‍वास ठेवत ठेवी ठेवलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे 1 ते 31 जुलै या कालावधीत विशिष्ट व्याजदरावर आधारित ठेववृध्दी योजना जाहीर केली. गेल्या महिन्याभरात पतसंस्थेतील विविध शाखांमध्ये ठेवी ठेवण्यासाठी चांगला प्रतिसाद लाभला. या कालावधीत 2 कोटी 25 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्यात खेडशी शाखेत 60 लाख रुपयांच्या ठेवी, प्रधान कार्यालयात 1 कोटी 25 लाखाच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. उर्वरित दोन्ही शाखांमध्येही त्याला प्रतिसाद लाभला आहे. गोल्ड लोन योजनेत 40 हजार रुपये प्रति तोळा कर्ज 12.50 टक्के व्याज दराने उपलब्ध करुन देण्यात आले होते. गोल्ड लोन योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून पतपेढीने लोकांना तत्काळ अर्थपूरवठा केला आहे. लोकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ठेववृध्दी योजना मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत 1 कोटी रुपयांच्या ठेवींचे लक्ष निश्‍चित केले आहे. आतापर्यंत ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता हे लक्षही पूर्ण होईल असा विश्‍वास श्री. शेवडे यांनी व्यक्त केला.

ठेवींवरील सवलती:- एक वर्षासाठी 8.50 टक्के व्याजदर, 3 वर्षांसाठी (मासिक किंवा त्रैमासिक) 7.75 टक्के व्याजदर, 3 वर्ष पुनर्गुतवणुकीसाठी 7.50 टक्के व्याजदर आकारला जाईल. रत्नागिरीतील कुसुमताई पतसंस्थेला मुख्य कार्यालयातही ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत.