मडुरे-पेडणे दरम्यान बोगद्यातील भिंत कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

3 स्पेशल मिळून 5 रेल्वे अन्य मार्गावरून वळवल्या

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे गणेशचतुर्थी निमित्त येणार्‍या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. गोवामार्गे येणार्‍या जाणार्‍या अनेक रेलगाड्या लोंढामार्गे वळविण्यात आलेल्या आहेत.

एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंढामार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गोव्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस सुरु असून मोसमी पावसाने इंचांचे शतक ओलांडले आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. पेडणेनजीक असलेल्या या बोगद्यात काल मध्यरात्रीनंतर 2.50 च्या सुमारास अंदाजे 5 मिटर लांबीची भिंत रुळावर कोसळली. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रुळावरील माती, दगड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.