मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; मात्र हरिनामाचा गजर नाही थांबला 

रत्नागिरी:-श्रावण महिना सुरू असल्याने जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. मात्र, या पाण्यातही भक्तांनी नाम सप्ताहात खंड पडू दिलेला नाही. रत्नागिरी तालुक्यातील तोणदे – भंडारवाडीतील सांब मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले असून, छातीपर्यंत आलेल्या पाण्यात उभे राहून भाविकांनी आपला नाम गजर सुरू ठेवला होता.

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले असून, अनेकांशी संपर्क तुटला आहे. श्रावणधारा जोरदार बरसत असतानाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाम गजर सुरू आहे.

काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने त्याचे पाणी तोणदे भागात शिरले आहे. या भागातील भंडारवाडी येथे असणाऱ्या सांब मंदिराला बुधवारी पुराच्या पाण्याचा वेढा पडला. या पुराच्या पाण्यातही येथील भाविकांनी नामसप्ताह सुरूच ठेवला होता. ग्रामस्थ होडीने मंदिरापर्यंत येत होते. तर काहीजण मंदिरात छातीपर्यंतच्या पाण्यात नाम गजर करत होते. मंदिरातील देवाच्या मूर्ती ग्रामस्थांनी उंचावर एका फळीवर ठेवल्या होत्या. मात्र, हळूहळू तेथेही पाणी भरण्यास सुरूवात झाली होती.