नद्यांना पूर; गावी परतणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी

रत्नागिरी:- मुसळधार पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला असून मुंबई गोवा महामार्गावरील अनेक मोठ्या नद्याना पूर आला आहे. बावनदी, अर्जुना पाठोपाठ अंजणारी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचा फटका मुंबईहुन गावाकडे परतणाऱ्या चाकमान्यांना बसला आहे. मुंबईहून गावी परतणारे चाकरमानी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

मुसळधार पावसाने जिल्ह्यात दणादण उडवली असून जिकडे तिकडे जलप्रलय निर्माण झाला आहे.  रायगडपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत सगळेच भाग पावसाने बाधित झाले आहेत. जगबुडी, वाशिष्ठी,  सावित्री, बावनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी केव्हाही रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. या मार्गावरील ब्रिटिशकालीन बावनदीचा पूल सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाठोपाठ अर्जुना नदीवरील पूलही पूर परिस्थिती पाहून बंद केल्याने वाहतूक करणाऱ्यांची तारंबळ उडाली आहे. रत्नागिरी  ते लांजा मार्गांवर असलेला अंजणारी पूलही प्रशासनाने वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

काजळी नदीने कालपासून धोक्याची पातळी ओलांडली आहे.  किनारी बघ जलमय झाले आहेत.  पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे काजळी पातळी स्थिर असून त्यात भर पडत आहे. काजळीची नियमित पातळी 16.50 मीटर आहे. पावसामुळं ती पातळी ओलांडली असून 17.50 इतकी आहे.  धोक्याच्या पातळी पेक्षा एक मीटरने जास्त पाणी वाहत असून आंजणारी पुलाच्या कठड्याला पाणी लागले आहे. पाणी केव्हाही पुलावरून जाण्याची शक्यता आहे. तसेच हा पूल खूप जुना असल्यामुळे प्रशासनाने सुरक्षितता म्हणून महामार्गावरील वाहतूक या पुलावरून बंद केली आहे. 

गणपती उत्सवासाठी अनेक चाकरमानी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही दिवस आधीच गावाकडे निघाले आहेत. त्यांना या पावसाचा फटका बसला असून ठिकठिकाणी वाहतूक बंद केल्यानं ते अडकून पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाचा फटका असाही चाकरमान्यांना बसला आहे. रस्त्यातचं अडकून पडल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे.