गणपती आरती आणि भजनात चाकरमान्यांना ‘नो एन्ट्री’ 

रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या काळात एसटीने येणार्‍या चाकरमान्यांना जिल्ह्यात थेट प्रवेश मिळणार आहे. पुुढील काही दिवसात दीड लाख चाकरमानी दाखल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक तालुक्यात एसटीचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. चाकरमान्यांना दहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असणार आहे. मात्र गणेशाच्या आरती, भजनाला चाकरमान्यांना उपस्थित राहाता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.  

ते म्हणाले, गणेशोत्सवासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाचे धोरण निश्‍चित झाले आहे. एसटीमार्फत चाकरमान्यांना कोकणात आणण्यात येणार असल्याचे परिवहन आणि पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. संस्थात्मक क्वारंटाईनची क्षमताही वाढविली जाणार आहे. महिला रुग्णालय लवकरच सुरू केले जाणार आहे. मात्र गणेशाची मिरवणूक, आरतीसाठी गर्दी किंवा भक्तांना भजन करता येणार नाही. येणार्‍या चाकरमान्यांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी आयएमएस प्रमुखांशी चर्चा झाली आहे. 80 डॉक्टरांची ऑर्डर झाली आहे. आयुर्वेदीक डॉक्टर, खासगी डॉक्टर आदींची फेराने ड्युटी लावण्यात येणार आहे. ग्रामीण यंत्रणेकडून 5 डॉक्टर्स 10 नर्स घेण्यात आले आहेत. अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून स्वच्छता करणार तसेच 56 सफाई कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी खासगी हॉस्पिटलना परवानगी देण्यात आली आहे.