अवघ्या चार दिवसात मासेमारी पुन्हा ठप्प 

रत्नागिरी:- नियमानुसार मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकांना सुरवातीला कोळंबी, बांगडा यासारखी मासळी मिळत होती; चारच दिवसात निसर्गाने दिशा बदलली आणि समुद्रात गेलेल्या नौका किनार्‍यावर विसावल्या.

मासेमारी बंदी कालावधी 31 जुलैपर्यंत होता. त्यानंतर 1 जूनपासून मासेमारी हंगामाला सुरवात झाली. ट्रालिंग, गिलनेटसारख्या नौकांना मासेमारीसाठी परवानगी आहे; मात्र यंदाच्या हंगामावर कोरोनाचे सावट आहे. खलाशांचा प्रश्‍न, आर्थिक कोंडीचा सामना करत असलेल्या मच्छीमारांना पहिल्याच दिवशी निसर्गाने साथ दिली. पावसाचा लवलेशही नसल्यामुळे समुद्रही शांत होता. ऐन पावसाळ्यात निवळलेल्या वातावरणाचा फायदा मच्छीमारांनी उचलला. तरीही पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध बंदरातील पाच ते दहा टक्केच नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या होत्या. मिरकरवाडा बंदरातून अवघ्या पंधरा ते वीस नौकांनी आरंभ केला. सलग तिन दिवसात 15 वावापर्यंत मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना कोळंबी समाधानकारक मिळत होती. त्याबरोबरच बांगडा, सौंदाळासारखे मासेही मिळाल्याने यंदाचा हंगाम चांगला जाईल अशी धारणा होती; परंतु तिनच दिवसांनी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हवामान बदलले आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहू लागले. सोबत मुसळधार पावसमुळे समुद्र खवळलेला होता. बिघडलेल्या वातावरणामुळे मासेमारीला पहिल्याच आठवड्यात ब्रेक लागल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले.