विज्ञान, वाणिज्यसाठी विद्यार्थ्यांची उडणार झुंबड

गुणांचा टक्का वाढला; जिल्ह्यात 27,420 जागा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 141 कनिष्ठ महाविद्यालयात 27,420 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरळित होणार आहे; परंतु 90 टक्केच्या पुढे असलेल्यांची संख्या अधिक असल्यामुळे विज्ञान, वाणिज्यसाठीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडणार आहे. यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यातील 22 हजार 211 विद्यार्थी पास झाले आहेत.

जिल्ह्यातील अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर होणार असला तरीही दर्जेदार महाविद्यालयांकडील पालकांचा ओढा अधिक असल्यामुळे तिथे प्रवेशासाठी आरक्षीत यादी अधिक राहणार आहे. जिल्ह्यात अनुदानित महाविद्यालयात 9,960 जागा, विनाअनुदानितमध्ये 13, 640, स्वयंअर्थसहाय्यीतमध्ये 3,820 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये कला शाखेत 7,360, विज्ञान शाखा 7,680, वाणिज्य 8,360, संयुक्त 4,020 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी बहूतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. पालकांसह विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे असतो. त्यामुळे विज्ञान शाखेसाठी प्रवेशाची आरक्षित यादी वाढते. तिथे प्रवेश मिळाला नाही तर मात्र काही विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट धरतात. अपेक्षित प्रवेश मिळाला नाही तर काहीजणं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतात.

त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाची संख्येत आणखी घट होते. प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. शहरी भागातील दर्जेदार महाविद्यालयातील प्रवेशासासाठी अनेकांचे प्रयत्न होतात. तिथे प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी पर्यायी महाविद्यालयाचा विचार करतात.