परिचारीका संघटना छेडणार कामबंद आंदोलन

कोरोना काळात बंदची हाक, 4 ऑगस्टला कामबंद आंदोलन

रत्नागिरी:- अपूर्‍या मनुष्यबळामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने पद भरतीसाठी दि.4 ऑगस्टला काम बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. शुक्रवारी परिचारीका संघटनेने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाची नोटीस  दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी येथे 63 नियमित अधिपरिचारीका, 33 बंधपत्रित अधिपरिचारीका, 16 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच कोविड अंतर्गत तीन महिन्याच्या कंत्राटी तत्वावर 6 अधिपरिचारिकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बंधपत्रित 33 अधिपरिचारीकांपैकी 16 अधिपरिचारीकांचा करार हा पुढील 15 दिवसांच्या कालावधीत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अधिकचा ताण येणार आहे .
प्रत्यक्षात पुढील 15 दिवसात पद भरती न झाल्यास 102 अधिपरिचारीका कार्यरत असतील . सर्व नियमित व बंधपत्रित अधिपरिचारिका या कोविड 19 मध्ये काम करीत आहेत. वार्डमध्ये 8 तास व अतिदक्षता विभाग यामध्ये 6 तासाची शिफ्ट ड्युटी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे 7 दिवसांचे चक्राकार पध्दतीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. कोरोना योध्दा  ही उपाधी मिरवत सर्व अधिपरिचारीका जीवाची पर्वा न करता विपरीत परिस्थितीत काम करीत आहेत. सुमारे 20 अधिपरिचारिकांना कोरोना संसर्ग झाला आहे. तरीही मनोधैर्य उंचावून सर्व अधिपरिचारीका काम करीत आहे.
कोरोनाची साथ  केव्हापर्यंत आटोक्यात येणार याबाबत अनिश्चितता आहे. आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण बाधित रुग्ण 1691 त्यापैकी बरे झालेले रुग्ण 1102 इतके आहेत. बाधित रुग्णांना अखंडित सेवा देताना त्यांना बरे करण्यात अधिपरिचारिका यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्यक्षात 450 अधिपरिचारीका यांची नियुक्ती होणे आवश्यक असताना 102 परिचारीका काम करीत आहेत, याच अधिपरिचारीकांना नॉन कोविड विभागाची सुध्दा कामे करावी लागत आहेत.
अपुर्‍या अधिपरिचारीका संख्येमुळे कार्यरत अधिपरिचारीकांच्या शारिरीक क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे रुग्णसेवा देताना रुग्णांचा रोषसुध्दा सहन करावा लागत आहे. कोरोना बाधित झाल्यानंतर राहत्या ठिकाणी , गावात व  समाजात अपराधी असल्याची वागणूक सहन करावी लागत आहे. तरी रुग्ण खाटांच्या संख्या वाढवतानाच उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करावा अन्यथा अधिपरिचारीका यांचे मानसिक व शारिरीक आरोग्य धोक्यात आल्यास रुग्णसेवेची व्यवस्था कोलमडून पडेल अशी स्थिती आहे.
परिचारीकांच्या भरतीसाठी दि.4 ऑगस्टला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाचे लक्ष  वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असे संघटनेच्या अध्यक्षा  एस.एस.बने यांच्यासह पदाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.