रत्नागिरी:- गुगलवरील जाहिरातीने वृद्धाला चांगलाच दगा दिला असून एलपीजी गॅसची डीलरशिप मिळवण्यासाठी ५ लाख २० हजार ८०० रुपये रक्कम भरूनही गॅस सिलेंडरची डिलरशीप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वायंगणी येथील वृद्धाने पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून आशिष शृंखला नामक संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष प्रभाकर बिडू (वय-५५,रा. वायंगणी,रत्नागिरी) यांनी आपल्या मोबाईलवर गुगल ऍप्स ओपन करून त्यावर एलपीजी गॅस सिलेंडर डीलरशिप एजन्सी रजिस्ट्रेशन २०२० अशी जाहिरात पाहिली होती.त्यानुसार संतोष यांनी चर्चेअंती डीलरशीप घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ६ एप्रिल २०२०रोजी एलपीजी गॅस वितरक एजन्सी फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तो फॉर्म संतोष यांनी भरला. त्यानंतर भरलेला अर्ज जाहिरातीत दिलेल्या ईमेलवर पाठविण्यात आला.अर्ज पाठविल्यानंतर ८ एप्रिल २०२० रोजी आशीष शृंखला नामक व्यक्तीने संतोष यांना कॉल केला. आपण एलपीजी वितरक चयन कंपनीमधून बोलत असल्याचे त्याने संगीलते होते.त्याच प्रमाणे ओबीसी वर्गासाठी ७५०० रुपये भरावे लागतील असे देखील सांगितले होते.
त्यानंतर पुन्हा आशिष शृंखला नामक व्यक्तीने संतोष यांना कॉल केला.व वेळोवेळी संपर्क करून डिलरशिप सर्टिफिकेट करिता ६४ हजार ९००, ना हरकत प्रमाणपत्र करिता ९६ हजार ४००, तर गॅस सिलिंडर सिक्युरिटी करिता ३ लाख ५२ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरायला सांगितले.हे भाचा वैभव व मुलगा सर्वेश यांनी कंपनीच्या खात्यावर जमा केले.
यानंतर संबंधित व्यक्तीने पाठवलेली कागदपत्रे बोगस असल्याचे लक्षात येताच याप्रकरणी संतोष बिडू यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी आशिष शृंखला नामक संशयिताविरोधात भा.द.वि.क ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ देऊस्कर करीत आहेत.