जिल्ह्यात 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता 

रत्नागिरी:- श्रावण महिना सुरू झाल्यापासून उघडीप दिलेला पाऊस पुढील चार दिवस मुसळधार कोसळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्गमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 
 

जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस बरसला. जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळ जिल्ह्यात धडकले. या दरम्यान मुसळधार पावसाची नोंद झाली. जूनच्या पंधरवड्या पर्यंत दमदार पाऊस कोसळला. यानंतर काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. जुलै मध्ये देखील आता पर्यंत 12 हजार मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 
 

मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. श्रावण महिना सुरू झाल्यापासून कधी हलक्या तर कधी जोरदार सरींनी हजेरी लावली. मात्र आता पुढचे चार दिवस कोकणात पाऊस धुमाकूळ घालत बरसेल अशी शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 29 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट पासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. मात्र पावसामुळे हा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नारळी पौर्णिमा 3 ऑगस्ट रोजी असून यानंतरच मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात होण्याची शक्यता अधिक आहे.