कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालये खुली करा 

क्रेडाईची मागणी; जिल्हा प्रशासनाला निवेदन 

रत्नागिरी:- कोरोना संसर्ग जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढत असून रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोना रुग्णांवरील उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. यावर मात करण्यासाठी खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खुली करावीत अशी मागणी जिल्हा क्रेडाई संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
 

याबाबतचे निवेदन नुकतेच देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रत्नागिरी शहर, परिसर आणि तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. जिल्हा रूग्णालयात उपचार करणारे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. अशावेळी इतर कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. 

यावर उपाय म्हणून खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार व्हायला हवा. त्यासाठी आपणाकडून खाजगी रुग्णालयांना निर्देश देण्यात यावेत. ज्यामुळे प्रत्येक रुग्णाला या ठिकाणी उपचार घेता येईल. इतर जिल्ह्यांमध्ये अशी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तरी या गोष्टींचा सहानुभूती पुर्वक विचार व्हावा अशी मागणी रत्नागिरी क्रेडाईचे अध्यक्ष दीपक साळवी, उपाध्यक्ष नित्यानंद भुते, उपाध्यक्ष महेश गुंदेचा, राजेंद्र जैन, सुमित ओसवाल, प्रवीण लाड, दर्शन जैन आदी पदाधिकारी यांनी केली आहे.