सलग नवव्या वर्षी बाजी; 98.77 टक्के निकाल
रत्नागिरी:- कोकणातील विद्यार्थ्यांनी सलग नवव्या वर्षी आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. दहावीच्या निकालात राज्यात आघाडी घेत कोकण बोर्ड प्रथम आले असून कोकण बोर्डाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यानेहि सलग नवव्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान कायम ठेवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.93 टक्के लागला आहे. कोकण विभागाने राज्यात प्रथम येण्याची परंपरा कायम राखली असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालामध्ये 10.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यावर्षी कोकण बोर्डाचा निकाल 98.77 % निकाल राज्यात लागला आहे. कोकण बोर्ड सलग 9 व्या वर्षी अव्वल स्थानी आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 22,547 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11,185 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातून 22,506 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11,180 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात 22,211 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11,060 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही जिल्ह्यात मिळून 33,271 विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत.
यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली आहे. सिंधुदुर्गचा निकाल 98.93 % इतका लागला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 98.69 % इतका लागला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गची मुलं हुशार हे पुन्हा एकदा निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
कोकण बोर्डात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी मुलींनीच बाजी मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 11,470 विद्यार्थी तर 11,077 विद्यार्थीनींची नोंदणी झाली होती. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात 11,950 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर मुलींमध्ये 10961 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत त्यामुळे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण हे 99.10 % इतके आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.28 % असून मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.60 % इतके आहे.
कोकण बोर्डाचा विचार करता मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. यावर्षी कोकण बोर्डात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.16 % इतके असून मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.39 % इतके आहे. तुलनात्मक विचार करता मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.77 इतके अधिक आहे. यावर्षी कोकण बोर्डाच्या निकालात देखील 10.39 % नी वाढ झाली आहे. 2019 मध्ये टक्केवारीमध्ये 88.38 निकाल कोकण बोर्डाचा लागला होता तर यावर्षी 98.77 निकाल कोकण बोर्डाचा लागला आहे.
कोकण बोर्ड यावर्षी कॉपीमुक्त झाले होते. गतवर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 प्रकरणं दाखल झाली होती मात्र मार्च 2020 मध्ये झालेल्या परीक्षेत एकही प्रकरण दाखल झालेले नाही त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा कोकण बोर्डाच्या झाल्या होत्या.
यावर्षी झालेल्या पुनर्परीक्षेत कोकण बोर्डाचा निकाल 77.99 % इतका लागला आहे. एकूण 1856 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 1380, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 476 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातून 1353 विद्यार्थी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 460 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 78.27 % तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पुनर्परीक्षेचा निकाल हा 77.17% इतका लागला आहे.
ऑनलाईन निकालानंतर दुसर्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. त्याबाबतच्या अटी व शर्ती संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी गुरुवार दि. 30 जुलै 2020 ते शनिवार दि. 8 ऑगस्ट 2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी 30 जुलै 2020 ते मंगळवा दि. 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे.