उद्यमनगर येथे तातडीने कोव्हिड रुग्णालय सुरु होणार: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांचा विचार करून शहरातील उद्यमनगर येथे महिला रुग्णालयात 100 खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी (ता. 28) तातडीने ते सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग आरोग्य विभाग आणि खासगी क्षेत्रातील घेण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

या अनुषंगाने नुकतीच राज्यस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, मेडिकल एज्युकेशनचे संजय मुखर्जी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, हेल्थ संचालिका अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 75 हजार चाकरमानी येण्याची शक्यता असून चाकरमान्यांना आणण्यासाठी बसेस सोडण्याबाबत पालकमंत्री, परिवहन मंत्री अनिल परब निर्णय घेणार आहेत. जेणेकरून चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही, यावर लवकरच निर्णय होईल असे ना. सामंत यांनी सांगितले.