ऑफिसबॉयने मारला 6 लाखांवर डल्ला

स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितास अटक; सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीजमधील तिजोरी फोडून सुमारे ६ लाखाची रोकड लांबविणाऱ्या त्यांच्या कार्यालयातील ऑफिस बॉय अजय दिपक मोहिते (वय २५ ,आरवली,बौध्दवाडी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रक्कमेसह सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.

सावर्डे येथील पाकळे कात कंपनीतील बंद तिजोरी फोडून १५ जूलै रोजी अज्ञात चोरट्याने सहा लाखांची रोकड लंपास केली होती. त्यानंतर सचिन सदाशिव गुरव यानी दिलेल्यान फिर्यादीवरुन सावर्डे पोलीसांनी  भा.दं.वि.सं. कलम ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल केला होता.

चोरीचा तपास सावर्डे पोलीसांकडून सुरु असताना  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने यांनी तात्काळ एक पथक तयार करुन सावर्डे येथे पाठविले  होते.  चोरीचा गुन्हा  अतिशय गुतांगतीचा व क्लीष्ट होता. कंपनीत सुमारे  १५० कामगार असल्याने पोलीसांनी गोपनिय माहिती गोळा करण्यावर भर दिला होता. तर ठसे तज्ञांना पाचारण करुन घटनास्थळावरील ठसे व त्यापरिसरात वावरणार्या कर्मचाऱ्यांचे ठसे तपासण्यात आहे.
 

कात इंडस्ट्रीज मध्ये ऑफीस बॉय म्हणून काम करणाऱ्या अजय दिपक मोहिते याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातून गुन्ह्यात चोरुन नेलेले ६ लाखाची रोख रक्कम, सॅक,  टू व्हिलर मोटार सायकल, आधारकार्ड व मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ७ लाख ६५० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .
अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, स. पो.नि. चंद्रकांत लाड, हेड कॉ . संदिप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, पो . ना . विजय आंबेकर , सागर साळवी, दत्ता कांबळे , उत्तम सासवे यांनी हि कामगिरी केली.