रत्नागिरीच्या ‘फुनसुक वांगडू’कडून स्वदेशी ड्रोनची निर्मिती

रत्नागिरी:- लॉकडाऊनचा सदुपयोग करत अनेकांनी चांगली चांगली कामे केल्याची उदाहरणे समोर असताना या लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीचा फुंसुक वांगडू प्रकाशात आला आहे. रत्नागिरीतील साखरपा येथील एका युवकाने घराच्याघरी ड्रोन तयार करत कमाल केली आहे. संपूर्ण स्वदेशी पार्ट वापरून त्याने हा ड्रोन तयार केला आहे.
 

पुरुषोत्तम कुमार जाधव हा साखरपा जाधववाडी इथे रहाणारा 32 वर्षांचा तरुण. 12वी नंतर आयटीआय शिक्षण पूर्ण करून तो आता वसई इथे एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पुरुषोत्तम गावी आला आहे.पुरुषोत्तमला लहानपणापासून इलेक्ट्रॉनिकची आवड असल्यामुळे त्याने ह्या लॉकडाऊन काळात काही वेगळे करण्याचा ध्यास घेतला. युट्यूब वर त्याने ड्रोन तयार करण्याचे व्हिडिओ पाहिले, गूगलवर अन्य माहिती मिळवली आणि तो ड्रोन तयार करण्याच्या प्रयत्नाला लागला. अहमदाबाद येथून त्याने लागणारे पार्ट मागवले. महत्वाचे म्हणजे चिनी बनावटीचे स्वस्त पार्ट उपलब्ध असताना पुरुषोत्तम याने स्वदेशी पार्टना प्राधान्य दिले.

हे पार्ट उपलब्ध झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसात त्याने हा ड्रोन तयार केला.सध्या हा ड्रोन 200 मीटर उंच जाऊ शकतो. तो तयार करण्यासाठी 22 हजार एवढा खर्च आला आहे. लवकरच ह्या ड्रोनवर कमेरा बसवण्याचा पुरुषोत्तम याचा प्रयत्न आहे.