मिरजोळेतील भूस्खलनावर कायम स्वरूपी उपाययोजना आवश्यक

रत्नागिरी:- मिरजोळे मधलीवाडी येथे नदीकिनारी होणारे भुस्खलन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्याची गरज आहे. येथील शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली भातशेती अडचणीत आली आहे. वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत तर काही अंतरावर असलेल्या घरांनाही भविष्यात धोका पोचू शकतो. याबाबत संरक्षक भिंतीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम ग्रामस्थांकडून सुरु आहे. त्याला प्रशासनासह लोकप्रतिनिधींची जोड मिळणे गरजेचे आहे.

मिरजोळे मधलीवाडी येथे गेली चौदा वर्षे सातत्याने होत असलेल्या भुस्खलनावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी नदी किनारी पूरसंरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने तयार केला होता. त्यासाठी 1 कोटी 42 लाख रुपयांची आवश्यकता आहे. निधी तरतूद करावी म्हणून पाटबंधारे विभागाकडून डिसेंबर 2019 मध्ये जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. सिंधुदुर्ग येथे झालेल्या आढावा बैठकीत पुरसंरक्षक भिंतीचा प्रस्ताव ठेवणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे वेळेत निधी मंजूर होऊ शकला नाही. सध्या कोरोनामुळे अनेक विकास कामांना निधी मिळणे अशक्य आहे. त्यामध्ये मिरजोळे पुरसंरक्षक भिंतीचेही काम रखडण्याची शक्यता आहे. या प्रकारावर वेळीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात तेथील भातशेतीसह काही अंतरावर असलेल्या घरांना धोका पोचू शकतो. पाटबंधारे विभागाकडून येथील भौगोलिक अभ्यासही केला गेला होता. मुसळधार पावसामुळे डोंगरातील जमिनीमधून वाहणारे अंतर्गत प्रवाह नदीच्या दिशेने येतात. त्यामुळे येथील भुस्खलन होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नदीच्या दिशेने सरकणार्‍या मातीला रोख लावण्यासाठी काँंक्रिटची भिंत घालणे आवश्यक आहे. 2006 साली सर्वात प्रथम भुस्खलन झाले होते. त्यानंतर दरवर्षी थोडा थोडा भाग वाहून जातो. डोंगराची माती नदीमध्ये जात असल्याने पात्रात माती साचते. यावर उपाययोजना म्हणून नदीवर बंधारा बांधण्यात आला होता. त्याचाही म्हणावा तसा उपयोग झालेला नाही. यंदाही थोडा भाग कोसळलेला असून भविष्यात तेथील भातशेतीचे नुकसान होऊ शकते. खचलेल्या भागापासून चारशे मिटर अंतरावर काही घरे आहेत. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर कदाचित त्याला धोका पोचू शकतो. येथे सुरक्षीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यक आहे.

संरक्षक भिंत घालावी यासाठी सातत्याने मागणी केली आहे. याकडे प्रशासनाकडून गांभिर्याने लक्ष दिले पाहीजे. पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव जिल्हा नियोजनमधून मंजूर झाला तर उपाययोजना करता येतील. अन्यथा दरवर्षी भातशेती अडचणीत येऊ शकतो असे इथल्या ग्रामस्थांच मत आहे.