‘निसर्ग’च्या तडाख्यात शासकीय इमारतींचे 22 कोटी रुपयांचे नुकसान

जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करणार: बाबू म्हाप

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रिवादळामुळे दापोली व मंडणगड तालुक्यातील शासकीय इमारतींचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तब्बल 22 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले असून यामध्ये शाळा वर्गखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करणार असल्याची माहीती जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी दिली.

बांधकाम समितीची आढावा बैठक शुक्रवारी (ता. 17) झाली. यावेळी अधिकारी उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या अनेक इमारतींची छपरे उडाली आहे. शाळांची छपर दुरुस्ती तत्काळ करणे गरजेचे आहे. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक सत्र सुरु झालेले नाही. येत्या दोन ते तीन महिन्यात शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यापुर्वी तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची आवशक्यता आहे. शासनाकडून या दुरुस्तीसाठी विशेष निधी येत नाही, त्यामुळे नियोजनमधून मिळणार्‍या निधीवरच ही कामे अवलंबून राहणार आहेत. त्यासाठी नियोजनकडे मागणी करण्यात आलेली आहे.जास्त दुरुस्तीची आवश्यकता आहे, तेथे लागणारा निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री अनिल परब व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येईल. रत्नागिरी लवकरात लवकर खड्डेमुक्त कशी होईल याकडे लक्ष देण्याच्या सुचना म्हाप यांनी बैठकीत दिल्या.