रत्नागिरी:- रत्नागिरीत असलेल्या वृद्धेच्या पुण्यातील बँक खात्याची माहिती घेऊन बँक खाते केवायसी नाही केले तर खाते बंद होईल, तत्काळ केवायसी करा असे सांगत मोबाईलवर पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून अज्ञाताने रत्नागिरीतील नेवरे येथे राहणाऱ्या वृद्धेच्या बँक खात्यातून 76 हजार 158 रुपये लांबवल्याचा गुन्हा ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फसवणूक झालेल्या उषा अभय खेर (61, रा. नेवरे) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना शर्मा नामक अज्ञात व्यक्तीने 7397692258 व 8617630594 या मोबाईल क्रमांकावरुन फोन तसेच मेसेज केला. यावेळी फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, एरंडवणे कर्वे रोड शाखा पुणे येथे असणाऱ्या बचत खात्याची माहिती घेतली. यानंतर फिर्यादी खेर यांना तुमच्या बचत खात्याचे के.वाय.सी. करणे गरजेचे असुन ते केले नाही तर तुमचे अकाऊंट बंद होईल असे सांगितले. यानंतर त्यांना मोबाईलवर मेसेजद्वारे लिंक पाठवुन ती लिंक फिर्यादी यांना ओपन करण्यास व त्याप्रमाणे माहिती देण्यास सांगितली. यावेळी फिर्यादी यांनी शर्मा नामक व्यक्तीला सदरची माहिती दिली. यानंतर त्यांच्या खात्यामधुन रक्कम रुपये 76,158 कपात झाली. फिर्यादी यांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.