गुहागर:- तालुक्यातील आबलोली येथे ट्रकवर चढवलेला पोकलेन सरकून ड्रायव्हर केबिनवर आला. त्यामुळे ट्रकचालक महामुद्दीन मामुल (वय ५०) आणि अभिषेक भोजने (वय ३२, रा. मासू) यांचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
महामुद्दीन मामुल यांचे मूळ गाव पनवेल असून ते अपघातग्रस्त ट्रकवर चालकाची नोकरी करतात. अभिषेक हा शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भोजने यांचा मुलगा आहे. तो कोल्हापूर येथे उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद झाल्यावर तो गावी परतला होता. गुरुवारी दुपारी १ च्या दरम्यान अभिषेक भोजने पोकलेन एका कामावरुन दुसर्या कामाचे ठिकाणी ट्रकमधुन घेऊन जात होते. तवसाळ आबलोली मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरील बाजुस तीव्र उतारावर अवघड वळण आहे. या वळणावर ट्रक आला असता मागे ठेवलेला पोकलेन सरकला आणि केबिनवर आला. वेगाने सरकलेल्या पोकलेनमुळे ट्रकचालक महामुद्दीन मामुल आणि अभिषेक भोजने हे दोघेही केबिन आणि पोकलेन यांच्यामध्ये चिरडले गेले.मदतीसाठी लाेकानी धाव घेतली.
जेसीबीच्या साह्याने पोकलेन मागे खेचण्यात आला. त्यानंतर केबिनमधील अडथळे दूर करुन ग्रामस्थांनी मामुल आणि भोजने या दोघांना बाहेर काढले. कोळवली व आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेत ठेवून तेथेच सलाईन लावून दोघांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गुरुवारी दुपारी अभिषेक भोजने व महामुद्दीन मामुल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.