राजापूर :- एकीकडे तीव्र उन्हाळा आणि दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असताना राजापूरला गंगामाई प्रकट झाली आहे. अवघ्या नऊ महिन्यातच गंगामाईचे आगमन झाले आहे. एकीकडे तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे. मागील काही दिवसांपासून पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्म्याने सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. दुसरीकडे डोंगरमाथ्यावर असलेल्या उन्हाळे गंगातिर्थक्षेत्री गंगेचे आगमन झाले आहे. निर्गमनानंतर नऊ महिन्यांतच गंगेचे पुनरागमन झाले आहे. सर्वत्र कोरोनामुळे भयभीत वातावरण असताना बुधवारी सकाळी ६ वाजता गंगाक्षेत्री गंगा प्रवाहीत झाली असल्याची माहिती गंगापूत्र श्रीकांत घुगरे यांनी दिली. मुळ गंगेसह काशीकुंड व सर्व कुंडात गंगेचे आगमन झाले आहे. त्यामुळे भाविकांत उत्साह संचारला आहे. गतवर्षी २० एप्रिल रोजी गंगेचे आगमन झाले होते. तर ६२ दिवसांच्या वास्तव्यानंतर २४ जून रोजी निर्गमन झाले होत.राजापूरची गंगा महाराष्ट्राभर प्रसिध्द असलेली गंगेच्या आगमनानंतर महाराष्ट्रासह विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात . मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचे सावट व त्यामुळे घालण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्बंध यामुळे भाविक गंगा आगमनाच्या काळात स्नानाचा आनंद घेऊ शकणार नाहीत.