रत्नागिरी:-वाढत्या उष्म्याने तयार झालेला हापूस आत्मा विभागामार्फत कराड, सातारा, वळंदसारख्या भागात थेट ग्राहकांच्या घरी पाठविण्यात येत आहे. आंबा घेऊन गेलेल्या गाड्या रिकाम्या आणण्यापेक्षा त्यातून कांदा, बटाटा यासह अन्य धान्य भरुन आणण्याची शक्कल लढवली जात आहे. राजापूरमधून गेलेल्या गाडीतून सात टन कांदा-बटाटा कमी दरात आणला गेला. माल कमी असल्यामुळे बाजारातील चढ्या दरावर हा पर्याय कृषी विभागाकडून काढण्यात आला आहे.
हापूस पिकू लागला, पण ग्राहकाअभावी बागायतदाराची पंचाईत होऊ लागली आहे. आत्मा विभागाने ग्राहक तयार करण्यासाठी यंत्रणा राबवली. पहिल्या टप्प्यात सुमारे 640 पेटी आंबा कराड, सातारा, फलटणला पाठवला. त्यानंतर पुन्हा साडेतीनशे पेटी आंबा राजापूरसह लांजा, रत्नागिरीतून वळंद, फलटणला रविवारी (ता. 5) रवाना झाला. शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी यशस्वीरित्या राबविली जात आहे. आंबा पेटी भरुन पाठवलेली गाडी तिकडून रिकामीच येते. त्याऐवजी गावातील लोकांच्या मागणीनुसार कांदा, बटाटा, गहू आणि जीवनावश्यक साहित्य कमी दरात आणण्याची संकल्पना कृषी विभागाकडून आंबा बागायतदारांच्या शेतकरी गटांना सांगण्यात आली. सध्या बाजारात कांद्याचा दर 40 ते 50 रुपये तर बटाटा 30 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातून येत असलेल्या गाडीतून या वस्तूंची वाहतूक झाली तर येतानाच्या भाड्यात जीवनावश्यक वस्तू आणणे शक्य होणार आहे. सध्या जीवनावश्यक वस्तू कमीप्रमाणात असल्यामुळे दर भडकले आहेत. तेथील शेतकर्यांनाही दर मिळत नाही. राजापूरमध्ये चार टन कांदा प्रतिकिलो 20 रुपये तर बटाटा तीन टन प्रतिकिलो 22 रुपयांनी शेतकर्यांकडून मिळाला आहे. वाहतुकीचा खर्च वगळून याच वस्तु कमी दरात गावच्या लोकांच्या हाती पडणार आहेत. याच धर्तीवर गहूही आणण्याचा निर्णय कृषी विभागाकडून घेण्यात आला आहे. गव्हाच्या वीस किलोच्या बॅग तयार करुन त्या मागणीनुसार लोकांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्याची वाहतूक या गाडीच्या माध्यमातून करणे शक्य आहे.