रत्नागिरी:-लॉकडाऊनमुळे किनारी भागातील छोट्या मच्छीमारांना नौका बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हे मच्छीमार नियमित समुद्रात जाऊन मिळणारी मासळी विकून त्यावर आपली गुजराण करत असतात. अशाप्रकारे संसार चालणारे हजारो कुटुंबे कोकण किनारपट्टीवर आहेत. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील सुमारे चाळीसहून अधिक नौका अशाच किनार्यावर उभ्या राहिल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या मच्छीमारी कुटूंबांची दैना उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या 160 किमीच्या किनारी भागात अनेक छोटी-मोठी बंदरे आहेत. काहीठिकाणी खाड्याही आहेत. मोठी बंदरे किंवा मोठ्या नौका वगळता किनारी भागात छोट्या नौका समुद्रात नेऊन मासेमारी करणारे अनेक छोटे मच्छीमार आहेत. एक सिलिडरच्या या नौकांवर चार ते पाच खलाशी असतात. सकाळी किंवा सायंकाळी समुद्रात जायचे. मिळणारी मासळी पकडून आणून ती स्वतःच्या गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात विकायची. त्यातून मिळणार्या उत्पन्नावर कुटुंब चालवायचे. यंदा उशिरापर्यंत पाऊस होता. त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांची अडचणच झाली होती. हंगामाच्या अखेरचा टप्प्यात याच छोट्या मच्छीमारांची चांगलीच धडपड सुरू आहे. गेले पंधरा दिवस कोरोनामुळे मासेमारी बंद झाली आहे. धास्तावलेले मच्छीमार एकत्र येऊन मासेमारीलाच बाहेर पडत नाहीत. या परिस्थितीला वरवडे, कासारवेली, काळबादेवी, मिर्या, जयगड, राजिवडा यासारख्या गावातील छोटे मच्छीमार सामोरे जात आहेत.