मुंबई:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा येथे भारतातील ३७ विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरून संपर्क केला होता. याची तत्काळ दखल घेत श्री. सामंत यांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना जीवनाश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिली आहे.
जीवनाश्यक वस्तू आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांना तिथे काही दिवस वास्तव्य करता येणार आहे. यातील मयुरी नायकोडी या महाराष्ट्रातील विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त करीत असताना म्हणाली की, “ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मदतीमुळे आम्हाला इथे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा झालेला आहे. याबरोबरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय दूतावास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खूप आभारी आहोत.”
श्री.सामंत म्हणाले, रीगा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने त्या विद्यार्थ्यांनी भीतीपोटी माझ्याशी संपर्क केला होता. या विद्यार्थ्यांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
या रीगा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भारतातील ३७ विद्यार्थी असून महाराष्ट्रातील ८ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या सर्वांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये, शासन आपल्याला मदत करेल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले.