विनाकारण बाहेर पडणार्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’

169

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. मात्र हे आदेश लागू झाल्यानंतरदेखील विनाकारण वाहने घेऊन फिरणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. अशा हौशानौशांची पोलिसांनी चांगलीच पिटाई केली असून अनेकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर सोमवारी रात्रीपासून पोलिसांनी पिटाई मोहीम हाती घेतली होती.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सरकारने संचारबंदीचे अस्त्र बाहेर काढले आहे. यापूर्वी १ दिवसाचा कर्फ्यूदेखील पाळण्यात आला. या एक दिवसाच्या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र त्याच्या दुसर्‍या दिवशीच रत्नागिरीत मोठी वर्दळ सुरू झाली होती. हे चित्र धोकादायक असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. सोमवारी पहिल्याच दिवशी पोलिसांनी ६ लाखांचा दंड वसूल केला होता तर अनेकांना चांगला ‘प्रसाद’देखील दिला होता.
सर्वत्र मनाई आदेश लागू असताना मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडू लागल्याने शासनाने संपूर्ण राज्यातच संचारबंदी लागू केली आणि या संचारबंदीचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी पोलिसांनी ‘पिटाई मोहीम’ हाती घेतली. राज्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर संचारबंदी लागू झाली. तत्पूर्वी शहरात अनावश्यक फिरणार्‍या दुचाकीस्वारांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला.
संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सकाळपासून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट उभे करून रस्ते बंद केले होते. शहरातील परटवणे, पालकर स्टॉप, एस.टी. स्टॅण्ड,जयस्तंभ, मारूतीमंदिर, कुवारबांव, भाट्ये चेकपोस्ट, हातखंबा आदी ठिकाणी बॅरिकेट उभे करून रस्ते बंद करण्यात आले होते.
या संचारबंदी काळात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात केला होता. केवळ दुचाकींना अत्यावश्यक कारणासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र थातूरमातूर कारणे सांगून काही हौशेनौशे दुचाकी घेऊन शहरात घिरट्या मारताना दिसून येत होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा ‘पिटाई मोहीम’ हाती घेतली. या कारवाईत अनेक दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांना पोलिसांनी संचारबंदीचा प्रसाद दिला.
शहरात पोलिसांनी कडक पावले उचलल्यानंतर अनावश्यक बाहेर येऊन मोटारसायकलवरून घिरट्या घालणारे अनेक दुचाकीस्वार या कारवाईनंतर गायब झाले. काहींनी तर मेडिकलचे खोटे कारण सांगून तर अनेकांनी जिन्नस व दूध न्यायला आलोय अशी खोटी बतावणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना चांगला दणका दिला. पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे