एखादी चांगली गोष्ट सरकारकडून करून घ्यायची असेल तर दबावगट हवा. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे. कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो. इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास व त्यातून रोजगाराच्या दृष्टीने यातून पावले उचलावीत. देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केले.
रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसर्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अल्पबचत सभागृहात ही परिषद दिवसभर आयोजित केली.
या वेळी आमदार तथा भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले की, भाजप शासनाने कोकण पर्यटन महामंडळाची स्थापना केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनार्यावरील गावे दत्तक घेऊन त्यातील 500 घरांमध्ये न्याहरी निवास योजना आखली. त्यासाठी तीनही जिल्हा बँकाच्या अध्यक्षांशी चर्चा करून 100 कोटी रुपये देण्याचे ठरले. या योजनेतून पर्यटक नक्की कोकणात राहतील, जास्तीत जास्त पर्यटन उद्योजकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन यांनी केले. समुद्रकिनारे साफ करणे हे थोडे कठीण काम आहे. याकरिता जर्मनमधून आयात केलेले एक मशीन मी आमदार निधी व सीएसआरमधून रत्नागिरीसाठी दिले आहे. आणखी तीन मशीन देण्याचा मानस आमदार लाड यांनी व्यक्त केला. निसर्गयात्री संस्थेच्या ‘आपलं गाव’ अॅपची माहिती मुंबईतील प्रत्येकाच्या घरात कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न करू आणि लवकरच याबाबत बैठक बोलावू, अशी ग्वाही दिली.
या वेळी हिरवळ संस्थेचे प्रमुख, जलनायक किशोर धारिया, मीनल ओक, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, जि. प. सदस्य उदय बने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, अॅड. विलास पाटणे, माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रशांत शिरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, उल्का विश्वासराव, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते.
दिवसभरातील कार्यशाळांमध्ये आनंदाचे शेत फुणगूस-राहुल कुळकर्णी, रस्टिक हॉलिडेज तुरळ-शिल्पा करकरे, डोंगरमाथा चिपळूण मंगेश गोवेकर, शेरलीन मोंटा पाचल, अविनाश पाटील, कोकण नेस्ट निवेंडी यज्ञेश भिडे, कोकण गाभा लांजा शिरीष झारापकर, पितांबरी फार्मस, राजापूर हेमंत देवधर यांनी आपापल्या प्रकल्पांची माहिती सादर केली.
कृषी पर्यटन, होम स्टे प्रकल्पधारक, पर्यटन सहकारी संस्था, ट्रॅव्हल्स एजंट यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. त्यासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली. कोकणात पर्यटन वाढीसाठी काही पावले उचलण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. याप्रसंगी कोकणात पर्यटनविषयक कामगिरी करणार्या प्रातिनिधीक निसर्गयात्री संस्था, आर्किटेक्ट मकरंद केसरकर, सी फॅन्स बीच रिसॉर्ट, सुधीर रिसबूड यांनी परिषद यशस्वी होण्याकरिता बहुमूल्य योगदान दिले.