चिपळूण:-मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे रखडलेले काम जलदगतीने करता यावे यासाठी 20 एप्रिल 2022 पासून परशुराम घाट दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कळंबस्ते-चिरणी-लोटे मार्गे वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड परशुराम घाटाचे काम गेली तीन वर्ष रखडले होते. चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्याबाबत पेढे येथील ग्रामस्थ आणि परशुराम देवस्थान कमिटी यांच्यामध्ये वाद झाल्याने घाटाच्या चौपदरीकरणाचा नारळ फुटला नव्हता. संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्याचा वाद मिटावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, जागेच्या मोबदल्याचा प्रश्न निकाली न निघाल्याने परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले होते. दरम्यान चिपळूण येथील वकील ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने पोलीस बंदोबस्त घेऊन घाटाचे काम सुरु करण्यात यावे असे आदेश रत्नागिरी जिल्ह्याधिकारी यांना दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर चौपदरीकरणाच्या कामाला विरोधात करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोध मावळला आणि घाटाच्या चौपदरीकरणाचा नारळ फुटला. घाटाचे काम सुरु झाल्यावर या ठिकाणी झालेल्या अपघातात एका कामगाराचा बळी गेला तर दोन जेसीबी मशिन्स कोसळलेल्या दरडीखाली गाडल्या गेल्या. या दुर्घटनेनंतर चौपदरीकरणाचे काम काहीसे मंदावले होते. मात्र, पावसाळा सुरु होण्यापूर्वी घाटाचे काम पूर्ण करायचे असल्याने आता पुन्हा कामाने वेग घेतला आहे.
सध्या दिवसरात्र घाटाचे काम सुरु असून महामार्गावर असणाऱ्या वाहुतकीच्या रहदारीमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. शिवाय दरडीच्या बाजूने खोदकाम सुरु असताना रस्त्यावर दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या वेळेत घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्या वेळेत महामार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी-कळंबस्ते मार्गे चिपळूण अशी वळविण्यात येणार आहे. घाटाचे काम वेळेत आणि जलदगतीने व्हावे, यासाठी महामार्ग बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला असून प्रवाशी आणि वाहन चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.
घाटाच्या कामासाठी दुपारी 12 ते 5 या दरम्यान वाहतूक वळविण्यात आल्याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर तर होणार आहेच. परंतु याचा जास्त परिणाम लोटे औद्योगीक वसाहतीच्या वेळापत्रक होणार आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत काम करणारे बहुतांशी कर्मचारी, अधिकारी हे चिपळूण शहरात राहतात. तिथून हे कर्मचारी लोटे औद्योगीक वसाहतीत ठरलेल्या शिफ्टला येत असतात. दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 वाजेनंतर परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार असल्याने पहिल्या आणि नाईट शिफ्टला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तेवढासा त्रास होणार नाही. परंतु दुपारच्या शिफ्टला येणारे कर्मचारी आणि पहिली शिफ्ट करून घरी जाणारे कमर्चारी यांना लोटे-चिरणी-कळंबस्ते मार्गे चिपळूणला जावे लागणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे.