रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नामसप्ताह आणि गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायतींनी विशेष काळजी घेतली आहे. नामसप्ताह आणि गणेशोत्सवासाठी 14 दिवस आधी या, क्वारंटाईन रहा नंतरच गावात मिसळा अशी नवी भूमिका अनेक ग्रामपंचायतींनी घेतली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. रुग्णसंख्या साडेसातशेवर पोचली आहे. मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरिता 8 जुलैपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे.
मात्र येणारा नामसप्ताह आणि गणेशोत्सव या कालावधीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आतापासूनच निर्णय घेतले जात आहे. या दोन्ही सणांना मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी गावात येतात. या कालावधीत कोरोना वाढीचा सर्वात मोठा धोका लक्षात घेऊन अनेक ग्रामपंचायतींनी चाकरमान्यांना या दोन्ही सणांपूर्वी 14 दिवस आधी येऊन क्वारंटाईन होण्याची विंनती केली आहे. 14 दिवस क्वारंटाईन राहा नंतरच गावच्या सणांमध्ये सहभागी व्हा, असा इशाराच देण्यात आला आहे.