रत्नागिरी:-जिल्ह्यात १३ जानेवारी रोजी कोरोनाची लस दाखल होणार असून, त्याची ड्राय रन उद्या शुक्रवारी जिल्ह्यात घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शेरखाने उपस्थित होते.
कोरोनाची लस आज येणार उद्या येणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र त्या चर्चेला आता आरोग्य विभागानेच पूर्णविराम दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १३ जानेवारी रोजी कोरोनाची लस दाखल होण्याची शक्यता असून ही तारीख वरिष्ठ पातळीवर आरोग्य विभागाला देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. फुले यांनी यावेळी दिली.
देशभरात सर्वत्र ८ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाबाबत ड्राय रन घेतली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातदेखील ही ड्राय रन होणार असून जिल्हा शासकीय रुग्णालय दापोली उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा आदी ठिकाणी ही रंगीत तालीम घेतली जाणार आहे.
यासाठी व्हॅक्सीलेशन टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये ५ कर्मचार्यांचा समावेश असून, १ व्हॅक्सीनेटर अधिकारी व व्हॅक्सीनेशन कर्मचारी अशी नावे या टीममधील कर्मचार्यांना देण्यात आली आहेत. ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली जाते त्या पद्धतीने ड्राय रनसाठी यादी तयार करण्यात आली आहे. वेटींग रुम, व्हॅक्सीनेशन रुम व रिकव्हरी रुम अशा तीन रुममधून ही प्रोसेस पार पडणार आहे. रुग्णाऐवजी व लाभार्थी हा शब्द रुग्णाला वापरला जाणार आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. संघमित्रा फुले म्हणाल्या की, शासनाकडून आम्हाला १३ जानेवारी ही तारीख मिळाली आहे. आम्ही १३ जानेवारी रोजी लस दाखल होईल या उद्देशाने संपूर्ण तयारी केली आहे. सुरुवातीला जिल्ह्यात १४ हजार आरोग्य कर्मचार्यांना ही लस दिली जाणार आहे. जे कर्मचारी फ्रन्टलाईनवर काम करीत होते त्यामध्ये आरोग्य यंत्रणा आघाडीवर होती. त्यापाठोपाठ पोलीस यंत्रणा काम करीत होती अशा कर्मचार्यांना सुरुवातीला लस दिली जाणार आहे.
या लसीकरणाकरीता ३ गट करण्यात आले आहेत. ५० ते ६० व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक, ५० वर्षाआतील व १८ वर्षापुढील असे तीन गट तयार केले आहेत. कोरोनाची लस ही दोन वेळा घ्यावी लागणार आहे. ही लस घेतल्यानंतर साईडइफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठीदेखील आरोग्य यंत्रणेने खबरदारी घेतली आहे.
दरम्यान या लसीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांनी सांगितले की, लस घेणे किंवा नाही ही ऐच्छिक बाब आहे. यासाठी कोणावरही जोरजबरदस्ती केली जाणार नाही. अगदी आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांनादेखील लस घेणेबाबत जबरदस्ती केली जाणार नसल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.