एकूण निधी 190 कोटी मंजूर, दुसर्या टप्प्यात 80 कोटीची ब्रेकवॉटर वॉल बांधणार
रत्नागिरी:- वारंवार धुप होणार्या मिर्या समुद्र किनार्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. या धूपप्रतिबंधक बंधारार्यासाठी एकूण 190 कोटी रुपये मंजूर आहेत. याचा सर्व्हे पूर्ण होऊन सीब्ल्यूपीआरसी कंपनीने 110 कोटीच्या धूपप्रतिबंधक बंधार्याला तांत्रिक मंजूरी दिली आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात बंधार्याचे काम होईल. दुसर्या टप्प्यात उर्वरित 80 कोटीच्या ब्रेक वॉटरवॉलचे काम केले जाणार आहे.
मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाला गती येणार आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधण्यात येणार्या सुमारे 190 कोटीच्या बंधार्यासाठी कन्सल्टंट म्हणून पुण्याच्या ‘मोनार्च’ कंपनीची नियुक्ती केली आहे. शासनामर्फत येत्या चार दिवसांमध्ये ही अधिकृत नेमणूक होणार आहे. कन्सल्टंट कंपनीला सुमारे 4 कोटी 32 लाख रुपये देऊन बंधारा बांधण्याची संपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. भविष्यातील दहा वर्षांपर्यंतची देखभाल दुरूस्ती त्यांच्याकडे राहणार आहे.
मिर्या बंधार्यासाठी आवश्यक असलेला सर्व्हे पूर्ण झाला आहे. पुण्याच्या सीडब्ल्यूपीआरसी या संस्थेने त्यापैकी 110 कोटीच्या धूपप्रतिबंधक बंधार्याला तांत्रिक मंजूरी दिली आहे. लवकरच हे काम सुरू होणार आहे. उर्वरित 80 कोटीमधून दुसर्या टप्प्यात ब्रेकवॉटर वॉलचे काम केले जाणार आहे. मात्र येत्या पावसाळ्याचा विचार करून बंधार्याच्या महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून दीड कोटी रुपये निधी दिली आहे.