रत्नागिरी:- यावर्षी 1 जून ते 31 जुलै या कालावधीत सुमारे 61 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात येत असल्याचे मत्स्य विभागाने जाहीर केले आहे. त्यानंतर समुद्रात मासेमारीसाठी जाणार्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिला आहे.
जून महिन्यात पावसाळा सुरु होतो. या कालावधीत वादळी वार्यासह पडणार्या मुसळधार पावसामुळे समुद्रही खवळलेला असतो. तसेच मे महिन्याच्या अखेरीस प्रजननासाठी मासळी किनार्याच्या दिशेने येते. त्यावेळी मासेमारी सुरु राहीली तर मत्स्यदुष्काळाला निमंत्रण दिल्यासारखेच आहे. त्यासाठी शासनाने पावसाळी कालावधीत मासेमारीवर निर्बंध घातले आहेत. काही वर्षांपुर्वी बंदी कालावधीत 10 जूनपासून सुरु होत होता; परंतु प्रजनन कालावधी अधिक मिळावा आणि मासळीची कमतरता जाणवू नये यासाठी मच्छीमारांशी चर्चा करुन हा कालावधी 1 जूनपर्यंत मागे आणला गेला आहे. त्यानुसार सर्व मासेमारी नौका मालक व मच्छीमार यांनी समुद्रात मासेमारीला गेलेल्या नौका 1 जुनपुर्वी बंदरात आणाव्यात. त्यानंतर कोणत्याही परिस्थतीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी दिली जाणार नाही असे मत्स्य विभागाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. त्या नौकांविरोधात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मच्छीमारी संस्थेतील सर्व संबधित नौका 31 मे 2021 वा तत्पूर्वी बंदरात पोहचतील, याबाबत नौका मालकांना सूचित करण्याची जबाबदारी राहील असेही त्यांनी सांगितले. मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक नौकाद्वारे व कोणत्याही अवैध मासेमारी होणार नाही, तसेच कोणतीही यांत्रिक नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी मच्छीमारी संस्थांना पत्राद्वारे कळवले आहे.