रत्नागिरी:- कोरोनाचे प्रमाण सध्या नसले तरी प्रतिबंध म्हणून डोस दिला जात आहे. सध्या ही प्रक्रिया थंडावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 10 लाख 81 हजार 900 लाभार्थ्यांपैकी पहिला डोस 23 हजार 765 जणांनी तर दुसरा डोस 1 लाख 68 हजार 920 जणांनी घेतला नसल्याचे समोर आले आहे. ऐच्छिक असलेल्या बुस्टर डोसचा आतापर्यंत 1 लाख 26 हजार 447 लाभार्थ्यांनी या डोसचा लाभ घेतला आहे.
कोरोनाचा मागील अडीच वर्षाचा काळ जिल्ह्याच्याद़ृष्टीने गंभीर स्वरूपाचा गेला. त्याला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागस्तरावर कोरोना लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली होती.
जिल्ह्यात एकूण कोरोना लसीकरणासाठी 10 लाख 81 हजार 900 लाभार्थी संख्या डोळ्यासमोर ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी आतापर्यंत हेल्थ वर्कर्स असलेल्या 21,636 लाभार्थ्यांपैकी पहिला डोस 18,055 जणांनी (83.45 टक्के) तर दुसरा डोस 15,439 जणांनी (71.36 टक्के) घेतला आहे. फ्रन्ट लाईन वर्कर्समध्ये 35,750 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत पहिला डोस 35,171 (106.77 टक्के) तर दुसरा डोस 34,836 जणांनी (97.44 टक्के) घेतला आहे. 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 65,900 लाभार्थ्यांपैकी पहिला डोस 4 लाख 97,868 (74.77 टक्के) तर दुसरा डोस 4, लाख 18,894 (62.91 टक्के) जणांनी घेतला आहे. 45 ते 59 वयोगटातील 2 लाख 43,900 लाभार्थ्यांपैकी पहिला डोस 2 लाख 79,897 (114.76 टक्के) तर दुसरा डोस 2 लाख 50,238 जणांनी (102.60 टकके) घेतला आहे. 60 वर्षांवरील वयोगटात 1 लाख 72,100 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 24,144 (130.24 टक्के) तर दुसरा डोस 1 लाख 93,573 (112.48 टक्के) लाभार्थ्यांनी घेतला आहे.
नागरिकांच्या 100 टक्के लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीत आतापर्यंत कोव्हीडशिल्डचा पहिला डोस 8 लाख 88 हजार 363 लाभार्थी तर दुसरा डोस 7 लाख 63 हजार 532 लाभार्थ्यांनी घेतला आहे. कोव्हॅक्सीनचा पहिला डोस 1 लाख 69 हजार 771 लाभार्थ्यांनी तर दुसरा डोस 1 लाख 49 हजार 448 लाभार्थ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या निर्बंधातही शासनस्तरावरून शिथिलता मिळाल्यानंतर मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून आजही कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या डोस घेतल्याचे प्रमाण 97.80 टक्के तर दुसरा डोस घेतल्याचे प्रमाण 84.39 टक्के इतके असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्फत पहिल्या व दुसर्या डोसनंतर बुस्टर डोस देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले. हा डोस घेण्यासाठी लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले. पण त्यामध्ये आतापर्यंत 1 लाख 26,447 जणांनी (11.69 टक्के) बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील 10 लाख 81 हजार 900 लाभार्थ्यांपैकी पहिला डोस 10 लाख 58 हजार 135 लाभार्थ्यांनी तर दुसरा डोस 9 लाख 12 हजार 980 लाभार्थ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 वयोगटात एकूण 46 हजार 374 लाभार्थ्यांपैकी पहिला डोस 36250 (78.17 टक्के) तर दुसरा डोस 25 हजार 649 (55.31 टक्के) लाभार्थ्यांनी घेतला आहे. 15 ते 17 वयोगटात एकूण 71,744 लाभार्थ्यांपैकी पहिला डोस 53,605 (74.72 टक्के) तर दुसरा डोस 44,009 (61.34 टक्के) लाभार्थ्यांनी घेतला आहे.