रत्नागिरी:- 1 टक्के टक्के व्याज दराने कर्ज देतो सांगत 11 लाख 60 हजाराला फसवणाऱ्या दोघा संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले. या फसवणुकीतील महिला साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आले आहे. दि. 22 फेब्रुवारी 2018 ते 21 जून 20108 या कालावधीत घडली होती.
विद्या राजकुमार निंबाळकर (57,रा.सेंट झेवियर्स स्ट्रिट परेल मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.यापूर्वी धर्मेश महेंद्र कुंवर(27,रा.ठाणे) याला अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात ओंकार संतोष चव्हाण (26,रा.खडपेवठार,रत्नागिरी) याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती.त्यानुसार,संशयितांनी कमी दराने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ओंकार चव्हाण,निखिल सावंत आणि प्रसन्न पेडणेकर यांच्याकडून आपल्या खात्यात 11 लाख 60 हजार रुपये भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली होती.
यावेळी फसवणूक करणा-या महिलेसह एकूण तीन आरोपींवर सन 2019 साली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्यात शहर पोलीसांनी सन 2019 साली धर्मेश महेंद्र कुंवर (27, रा.ठाणे) याला अटक करण्यात आली होती. परंतु गुन्ह्यातील एका महिला व एका पुरुष आरोपींचा पोलीसांना ठावठिकाणा मिळून येत नव्हता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संबंधित गुन्ह्यातील महिला विद्या राजकुमार निंबाळकर ही कासारवडवली, ठाणे येथे आलेली आहे हे समजले होते. यावर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीत कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील एक पथक तयार करुन कासारवडवली, ठाणे येथे पाठविण्यात आले. या पथकाने दि. 15 फेब्रुवारी रोजी कासारवडवली पोलीस ठाणे येथील पोलीसांच्या मदतीने महिला आरोपी विद्या निंबाळकर हिचा शोध घेतला असता तेव्हा संशयित विद्या निंबाळकर ही सिव्हर वूडस बिल्डींग, कृष्णा ग्रीन लॅण्ड, कासावडवली येथे तिची मुलगी प्रिया कमलेश दळवी हिच्या घरी सापडली होती. यावेळी तिचेसोबत तिच्या दोन मुली , एक जावई व आणखी सुनिल सहदेव कदम हे देखील मिळून आले.
यावेळी केलेल्या चौकशी दरम्यान सुनिल कदम हे गेल्या २० वर्षांपासून महिला आरोपी विद्या निंबाळकर हिचे सोबत रहात असल्याचे समोर आले. तसेच यावेळी घेतलेल्या घरझडती मध्ये सुनिल कदम याकडे दोन मोबाईल, एअरटेल कंपनीची अनेक सीमकार्डस, वेगवेगळ्या बँकेची पासबुक्स, चेकबुक्स, डेबीट – क्रेडीट कार्डस तसेच हिशोबाची इतर आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली. याबाबत सुनिल कदम यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.
त्यांच्याकडे मिळालेल्या आक्षेपार्ह कागदपत्रांवरून विद्या निंबाळकर हिने केलेल्या गुन्ह्यात त्याचा देखील सहभाग असण्याची तसेच दोघांनी मिळून अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता लक्षात घेऊन सुनिल कदम यासदेखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले व रत्नागिरीत आणण्यात आले होते. तर सोमवारीच या प्रकरणी विद्याला अटक करण्यात आली होती. संशयित महिला आरोपी विद्या निंबाळकर व सुनिल सहदेव कदम हे अनेक वर्षे मुंबईत रहात असल्याने मुंबई मधील पोलीस ठाण्यांमध्ये त्यांचे वर गुन्हे दाखल आहेत का? याबाबत माहिती घेतली असता, विद्या निंबाळकर व सुनिल कदम याचेवर भोईवाडा पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल असल्याचे समजले. भोईवाडा पोलीस ठाणे, मुंबई येथे या दोघांसह अन्य तीन आरोपींवर भोईवाडा पोलीस ठाणे येथे भा. द. वि. क. 420, 465, 468, 471, 34 अन्वये सुमारे रुपये दीड कोटी रक्कमेचा फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे तसेच सदर गुन्ह्यात विद्या निंबाळकर व सुनिल कदम हा आरोपी असल्याचे समजले.
त्यामुळे शहर पोलिसांनी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करून अटक केलेल्या या दोघा संशयितांकडून फसवणुकीच्या अन्य गुन्हे बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी, परि. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ .सुदर्शन राठोड, रत्नागिरी, पोलीस निरीक्षक अनिल लाड, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रनागिरी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे रा.पो.नि. एम. एस. भोराले, पो.उ.नि. एस. वांगणेकर, पो.ना. जाधव, पो.ना. सावंत, म.पो.ना. गुरव, पो.शि. लिंगायत यांनी केली.