रत्नागिरी:- तालुक्यात तरुण वकील ॲड. सौरभ सोहनी (३२) यांनी भाट्ये पुलावरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सौरभच्या काही मित्रांची आणि घरमालकाची चौकशी केल्यावर मृत्यूचे गूढ उकलले आहे.
राजापूर येथील असलेले सौरभ सोहनी रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस येथे काही मित्रांसोबत पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. रत्नागिरीतील न्यायालयात ते सन २०१५ पासून वकिलीचा व्यवसाय करत होते. सोमवार, दिनांक २२ जुलै रोजी रात्री जेवायला जातो, असे सांगून ते मित्राची दुचाकी घेऊन बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांनी व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ‘माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून कृपया माझ्या मित्रांची, नातेवाइकांची, रुम मालकांची चौकशी करू नये,’ असे ठेवले होते. ही बाब त्याच्या मित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीसांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी २३ जुलैला शहरातील खडपेवठार येथील किनारी त्यांचा मृतदेह सापडला होता.
त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या काही मित्रांची तसेच घरमालकांची चौकशी केली. या चौकशीमध्ये केसेस मिळत नसल्याने ते निराश होते. चांगले शिक्षण घेऊनही आपल्याला मनासारखे काम मिळत नसल्याने त्यांना नैराश्य येत होते, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.