महसूल विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध
रत्नागिरी:- शासनाला वर्षाला सुमारे ९० कोटीचा महसुल मिळवून देणाऱ्या वाळु गटांचे लिलाव कोरोनामुळे दोन वर्षे रखडले होते. जिल्हा खनिकर्म विभागाने यावर्षी वाळु गटांच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ड्रेझर गटासाठी एक तर हातपासाटीसाठी ३१ गटांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. ड्रेझरसाठी अजून अर्ज आलेले नाहीत. मात्र हातपाटीसाठी १० अर्ज दाखल झालेआहेत.
दोन वर्षामध्ये स्वमित्वधनातून शासनाला मिळणारे उत्पन्न बुडाले. कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे आता जिल्हा खनिकर्म विभागाने ड्रेझनर आणि हातपाटी गटासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मेरीटाईम बोर्डाला हे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मेरीटाईम बोर्डाने सर्व्हे करून एका ड्रेझर गटाला मंजुरी दिली आहे. यामध्ये वाशिष्ठी नदीतील दाभोळ खाडी ड्रेझर गटाचा लिलाव जाहीर झाला आहे. १२ हजार ३८६ एक ब्रास या प्रमाणे २२ हजार ०८४ ब्रासला परवानगी दिली आहे. मात्र या गटासाठी अजून एकही अर्ज आलेला नाही. त्याची मुदत एकचदिवस आहे. या दिवसात प्रतिसाद न मिळाल्यास पु्न्हा जाहिरात काढण्याची वेळ खनिकर्म विभागावर येणार आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील ३१ हातपाटी वाळु गटांना मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. या गटांमध्ये जोगनदीमधील अंजली खाडी ७ उपगटांसाठी हा लिलाव आहे. तर वाशिष्ठी नदीतील दाभोळ खाडीतील १५ गट, शास्त्री नदीतील जयगड खाडीमध्ये ३ गट, काळबादेवी खाडीतील ६ गट, अशा ३१ गटांसाठी हातपाटी वाळु लिलाव होणार आहेत. त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडे १० अर्ज आले आहे. यावरलवकरच निर्णय होणार आहे. खनिकर्म विभागाला या खनिजातून सुमारे ९० कोटीचा महसुल मिळत होता. मात्र कोरोनामुळे ते उत्पन्न बुडाले. यावर्षी या गटातून शासनाला चांगला महसुल मिळणार आहे.