पूर्णगड सागरी पोलिस ठाणे अंतर्गत कारवाई
रत्नागिरी:- वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनधारकांना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याने चांगलाच दणका दिला आहे. गेल्या वर्षभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ६६० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८४ हजार ६०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
पावस परिसरातून सागरी मार्ग जात असल्याने व पर्यटन क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. तसे रस्ते अरुंद असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरू असते. या पार्श्वभूमीवर अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम न पाहता आपली वाहने हाकत असतात. अनेक कार्यक्रमांतून वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी प्रबोधन व आवाहन केले जाते. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेकांना अपघातामध्ये मोठ्या दुखापती झाल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला प्रतिबंध बसावा यासाठी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले जाते.
नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांना नाकाबंदी करून कारवाईचा बडगा उगारावा लागतो. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षभराच्या कालावधीमध्ये या परिसरात दुचाकी, चारचाकी, अशा ६६६ वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात पूर्णगड सागरी पोलिसांना यश आले आहे.