रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हयात एकूण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ उपकेंद्र, ३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ९ ग्रामीण रुग्णालय व ३ उप जिल्हा रुग्णालय आहेत. यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पहिल्या टप्यामध्ये २६ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. दुसर्या टप्यातील ३८ रुग्णवाहिकांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा मंगळवारी दूरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित करण्यात आला आहे.
रुग्णवाहिकांमार्फत नियमीत ग्रामीण भागातील जनतेला तातडीच्या सेवा तसेच अत्यावश्यक सेवा देण्यात येतात. गरोदर माता, स्तनदा माता व बालके यांना तसेच रुग्णांना संदर्भसेवा देण्यात येतात. जेणेकरुन रुग्णांना त्वरीत सेवा मिळतात व रुग्णांचे प्राण वाचवले जातात. त्यामुळे बाल मृत्यू, अर्भक मृत्यू हे टाळता येतात. जिल्हयामध्ये ६७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. परंतू त्यातील ४७ रुग्णवाहिका पंधरा वर्षाच्या वर होत्या व सदर वाहने खुप जुनी होती. या कार्यक्रमात पालकमंत्री अनिल परब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला प्रथमच नविन ६४ रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत.
यामधील ९ रुग्णवाहिका खणी कर्म निधीमधून मंजूर होत्या, ७ रुग्णवाहिका शासनाकडून मिळाल्या आहेत. तर १० रुग्णवाहिका ग्रामविकास विभागामार्फत १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून आणि ३८ रुग्णवाहिका आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना गुणवत्ता पुर्ण संदर्भ सेवा देण्यात येतील व यामुळे जिल्ह्याच्या आरोग्याचा दर्जा सुधारेल, असा विश्वास अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी व्यक्त केला आहे. दुसर्या टप्यात प्राप्त झालेल्या ३१ रुग्णवाहिकांपैकी प्राथमिक आरोग्य केंद्र, २ प्रादेशिक मनोरुग्णालय व ५ जिल्हा शल्य चिकित्सक अशा एकूण ३८ रुग्णवाहिकांचा दूरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन लोकार्पण सोहळा होणार आहे.