तौक्तेतील चक्रीवादळातील हानी
रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळातील २१ कोटी ७० लाख नुकसान भरपाईपैकी आतापर्यंत ७ कोटी ६० लाखाची मदत वाटप करण्यात आली आहे. वादळातील नुकसान भरपाईपैकी अडीच रुपये मदत दिल्याचे दाखवा, अन्यथा राजीनामा द्या, असा व्हिडिओ काहींनी व्हायरल केला होता आता त्यांनी बोलावे, असा चिमटा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढला.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते.सामंत म्हणाले, नवीन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. त्याचबरोबर, कोरोना, पाऊस आणि तौक्ते वादळातील भरपाईचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक क्षेत्रामध्ये चांगले काम आहे. त्यांना फ्री हॅण्ड काम करता यावे, आम्ही सर्व राजकीय नेते त्यांच्या पाठिशी आहे. महिन्यामध्ये दुसरी लाट थोपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसे नियोजनही त्यांनी केले आहे.तौक्ते वादळाचा आज आढावा घेतला. वादळामध्ये किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना मोठा तडाका बसला. यामध्ये सुमारे २१ कोटी ७० लाखाच्या वर नुकसान झाले. शासनाने निकष बदलून बाधितांना भरपाई दिली आहे. त्यापैकी घरांचे ३ कोटी, शेतीचे ४ कोटी ३९ लाख, मृतांना ८ लाख, तर मच्छीमारांना ११ लाख ७४ हजार , अशी सुमारे ७ कोटी ६० लाख एवढी मदत वाटप झाली.